Thursday, May 9, 2019

१८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या आरंभदिनाचे ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण !

१० मे या दिवशी १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा आरंभदिन असल्याच्या निमित्ताने...

१८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या आरंभदिनाचे ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण !


लेखातील ठळक सूत्रे :

  • समाजमनाचा उद्रेक !
  • मंगळ-हर्षल यांची स्फोटक युती !
  • लग्नेश मंगळ बलवान नसल्याने समरात पराजय
  • अष्टम स्थानातील शनीमुळे हानीचे प्रमाण अधिक
  • १८५७ च्या समराला लाभली अद्वितीय कीर्ती !

विषयप्रवेश : हिंदुस्थानने केलेल्या प्रचंड उठावामुळे ज्या ब्रिटिश साम्राज्याचा पाया छिन्नविच्छिन्न झाला, असे १८५७ चे स्वातंत्र्यसमर दिनांक १०मे १८५७ या दिवशी चालू झाले. या समराची ठिणगी प्रथम मेरठ येथे पडली आणि मग तिचे वणव्यात रूपांतर झाले. गुप्त नियोजन हे या समराचे वैशिष्ट्य होते. संपूर्ण राष्ट्र क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे ठाकले, तरी देखील इस्ट इंडिया कंपनी सरकारला याचा मागमूस लागला नाही. संपूर्ण समाजाचा सहभाग, समर्पण आणि संघटन ही या समराची वैशिष्ट्ये होती. श्रीमंत नानासाहेब पेशवे, सेनापती तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई या धुरीणांनी क्रांतीचे नेतृत्व केले. इस्ट इंडिया कंपनी सरकारचा भारतावरील अंमल नष्ट करणे, हा या समरामागील हेतू होता. गाय आणि डुकराची चरबी असलेले काडतूस, शेतकर्‍यांवर नगदी पीके घेण्याची सक्ती इत्यादी कारणे ही केवळ निमित्तमात्र होती. इंग्रजांनी तेव्हा ही क्रांती दडपण्याचा प्रयत्न केला; परंतु स्वातंत्र्यप्राप्तीचा अग्नि जो या समरामुळे प्रदीप्त झाला, तो पुढे ९० वर्षे धगधगत राहिला ! प्रस्तुत लेखात दिनांक १० मे १८५७ या दिवशीच्या चंद्रकुंडलीचे ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण केलेे आहे.


समाजमनाचा उद्रेक !
प्रथम स्थानावरून जनतेचा विचार होतो. १० मे १८५७ या दिवशी चंद्र वृश्‍चिक राशीत होता. वृश्‍चिक रास जलतत्त्वाची आणि तिचा स्वामी मंगळ अग्नितत्त्वाचा असल्याने ही रास भावनाशील असूनही लढवय्या वृत्तीची आहे. प्रथम स्थानातील वृश्‍चिकेचा चंद्र जनतेच्या मनातील भावनांचा उद्रेक, सूडाग्नी दर्शवतो.

मंगळ-हर्षल यांची स्फोटक युती !

सप्तम स्थान हे युद्ध, क्रांती यांचे स्थान आहे. लग्नेश मंगळ सप्तम स्थानात हर्षलच्या युतीत आहे. हा योग स्फोटक असून युद्ध, क्रांती दर्शवतो.

लग्नेश मंगळ बलवान नसल्याने समरात पराजय

सप्तम स्थानात असणारी बुध-मंगळ युती वृश्‍चिक लग्नासाठी अशुभ आहे. मंगळाचा शत्रू असणारा बुध हा अष्टमेश असल्याने १८५७ च्या समरात फितुरांनी इस्ट इंडिया कंपनीला साथ दिली, त्यामुळे देशाची हानी झाली. लग्नेश मंगळ बलवान नसणे, मंगळावर शुभ ग्रहाची दृष्टी नसणे यांमुळे समरात पराजय पदरी पडला.

अष्टम स्थानातील शनीमुळे हानीचे प्रमाण अधिक

चतुर्थ स्थानावरून दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती इत्यादींचा विचार केला जातो. कुंडलीत चतुर्थेश शनि अष्टम या मृत्यु स्थानात असल्यामुळे समराच्या दरम्यान आणि त्यानंतर पडलेल्या दुष्काळात ८ लक्षहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. - (संदर्भ : विकीपिडिया) वृश्‍चिक लग्नाला अशुभ असणारा शनि अष्टम स्थानात असल्याने समरात हानी अधिक प्रमाणात झाली, तसेच युद्ध बराच काळ चालू राहिले.

१८५७ च्या समराला लाभली अद्वितीय कीर्ती !

प्रथम स्थानातील चंद्र भाग्य स्थानाचा स्वामी आहे. भाग्य स्थान कीर्तीदायक असते. त्यामुळे या समराची अद्वितीय कीर्ती झाली. या समरातून पुढे अनेक क्रांतीकारकांनी प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढा दिला.


१८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील ज्ञात-अज्ञात वीरांना शतश: नमन !

देशाला सुराज्य मिळवून देणे, हे आता आपले दायित्व आहे !


॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

श्री. राज धनंजय कर्वे, ज्योतिष विशारद
संपर्क क्र. ९४२३१८५२५६
ई-मेल : raj9karve@gmail.com

ऑस्ट्रेलियातील अग्नितांडव ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये सप्टेंबर २०१९ पासून सतत वणवा पेटत आहे. यामध्ये आतापर्यंत ५० कोटी प्राण्यांचा बळी गे...