Sunday, December 30, 2018

इंडोनेशियाची त्सुनामी... (भाग १)


इंडोनेशियाची त्सुनामी...
(भाग १)


विषयप्रवेश : २२.१२.२०१८, शनिवार या दिवशी रात्री ९.३० या स्थानिक वेळेच्या सुमारास इंडोनेशियाधील सुंडा स्ट्रेट येथे ज्वालामुखीचा उद्रेक होऊन भूस्खलन झाल्यामुळे सुमात्रा आणि जावा या बेटांच्या किनारपट्ट्यांवर त्सुनामी आली. त्यामध्ये ४२६ नागरिकांचा मृत्यू झाला. जवळपास १५०० नागरिक जखमी झाले. या घटनेचा मेदिनीय ज्योतिष शास्त्राच्या आधारे आढावा घेऊया. प्रथम आपण भूकंप, त्सुनामी आणि ज्वालामुखी या नैसर्गिक आपत्तींची कारणे, त्यांचे कारक ग्रह, कुंडलीतील कारक स्थाने इत्यादी घटकांचा विचार करूया.

भूकंप, त्सुनामी आणि ज्वालामुखी यांची कारणे आणि संबंधित कारक ग्रह

भूपृष्ठावर मुळातच ज्या भेगा आहेत, अशा भेगांखाली असणारे खडकांचे थर जेव्हा एकमेकांवर घसरतात, तेव्हा भूगर्भात अकस्मात हालचाली होतात. भूगर्भात होणार्‍या हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्यामुळे भूकंप लहरी निर्माण होतात. या भूकंप लहरींमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग थरथरतो. याला आपण भूकंप म्हणतो. (संदर्भ : विकिपीडिया)
भूगर्भातील हालचाली शनि ग्रहाशी संबंधित आहेत. शनि ग्रह वायुतत्त्वाचा कारक असून गती ही वायुतत्त्वाची क्रिया आहे. घर्षणक्रियेत गती असल्याने घर्षणातून अग्नि तयार होते. उदा. तळहातावर तळहात चोळल्यावर त्यांच्यात उष्णता निर्माण होते. मंगळ ग्रह अग्नितत्त्वाचा कारक आहे म्हणजेच भूगर्भात होणार्‍या हालचालींमुळे उत्सर्जित होणार्‍या उर्जेचा नैसर्गिक कारक मंगळ ग्रह आहे. त्यामुळे भूकंपाचा विचार करतांना शनि आणि मंगळ या ग्रहांचा विचार प्रामुख्याने होतो.
भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्ठापासून जितका निकट असतो, तितकी हानी अधिक होते. हाच केंद्रबिंदू समुद्राच्या तळाशी असता त्सुनामी लाटा निर्माण होतात. समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे विस्थापन होऊन पाण्याचा असमतोल निर्माण होतो. त्सुनामी लाटा समुद्रात दूरवर असतात, तेव्हा त्यांची लांबी शेकडो किलोमीटर असते अन् उंची अल्प असतेे; त्यामुळे त्या सहज लक्षात येत नाहीत. मात्र जशा त्या लाटा किनार्‍यालगतच्या उथळ भूपृष्ठावर येतात, तसा त्यांचा वेग अल्प होऊन उंची वाढत जाते. त्यामुळे पाण्याची जणू मोठी भिंत तयार होते. अशी एक लाट मोठा परिसर उद्ध्वस्त करण्यास पुरेशी असते. (संदर्भ : विकिपीडिया)
ज्वालामुखीमुळेसुद्धा भूकंप किंवा त्सुनामी निर्माण होऊ शकतात. पृथ्वीचे कवच १७ मोठ्या, कठीण टेक्टॉनिक प्लेट्स मध्ये विभागलेले आहे. या प्लेट्स उष्ण, मऊ आवरणावर तंरगत असतात. या प्लेट्स जेव्हा एकमेकांपासून भिन्न होतात किंवा एकत्र येतात, तेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन लावा, राख इत्यादी गोष्टी बाहेर फेकल्या जातात. (संदर्भ : विकिपीडिया)
येथेसुद्धा टेक्टॉनिक प्लेट्सचे चलत्व शनि ग्रहाच्या कारकत्वाखाली आहे; तर लावा, उष्णता हे मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी यांचे मुख्य कारक शनि आणि मंगळ हे ग्रह आहेत. भूकंप आणि ज्वालामुखी यांचा विचार करतांना पृथ्वीतत्त्वाचा कारक असणारा बुध ग्रह, तसेच त्सुनामीचा विचार करतांना जलतत्त्वाचा कारक असणारा शुक्र ग्रह यांचाही विचार करणे योग्य ठरेल.

नैसर्गिक आपत्तींची कारक स्थाने

१. चतुर्थ स्थान : नैसर्गिक आपत्तींचा मुख्य विचार चतुर्थ स्थानावरून केला जातो. शेती, जमीन, खाण, जलाशय, पर्जन्य, हवामान इत्यादी गोष्टींचे हे कारक स्थान आहे.

२. अष्टम आणि द्वादश स्थान : अष्टम आणि द्वादश ही दोन स्थाने हानी, नुकसान यांचे कारक असल्याने नैसर्गिक आपत्तींना पूरक अशी आहेत.

३. मारक आणि बाधक स्थाने : द्वितीय आणि सप्तम या मारक स्थानांचा, तसेच लग्नराशीनुसार बाधक स्थानाचा विचार करावयास हवा.

कुंडली अभ्यास

इंडोनेशिया हा देश अग्नि वृत्तावर (पॅसिफिक रिंग ऑफ फायर) स्थित आहे. इंडोनेशियामध्ये १२७ सक्रिय ज्वालामुखी आहेत. त्यामुळे तेथे वारंवार भूकंप, त्सुनामी आणि ज्वालामुखी या नैसर्गिक आपत्ती येत असतात. इंडोनेशिया देशाची लग्न कुंडली पुढे मांडली आहे. त्याद्वारे वारंवार नैसर्गिक आपत्ती येणे हा परिणाम दर्शवणारे योग अभ्यासता येतील.


लग्न कुंडलीतील सततचे नैसर्गिक आपत्ती दर्शवणारे योग

चतुर्थ स्थानाचा स्वामी शनि ग्रह नवम् स्थानात असून त्याची राहू ग्रहाशी युती आहे. शनि आणि राहू हे दोन्ही ग्रह तमोगुणी असल्याने त्यांची युती प्रतिकूल आणि बाधक आहे. चतुर्थेश शनि ग्रह राहू ग्रहामुळे दूषित झाल्याने चतुर्थ स्थान प्रतिकूल झाले आहे; परिणामी इंडोनेशियामध्ये सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत असतात आणि तेथील नागरिकांसाठी ही नित्याची बाब झाली आहे.
शनि आणि राहू या ग्रहांसोबत शुक्र ग्र्रहसुद्धा नवम स्थानात आहे. शुक्र ग्रह कुंडलीतील लग्न आणि अष्टम या स्थानांंचा स्वामी असल्याने त्याची स्थिती महत्त्वाची आहे. लग्न हे जनतेचे कारक स्थान आहे, तर अष्टम हे नुकसान, दुर्घटना यांचे कारक स्थान आहे. शुक्र ग्रह शनि, राहू या ग्रहांच्या युतीमध्ये असल्याने तेथील जनतेला नेहमी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो, तसेच पुष्कळ नुकसान होते. शनि-राहू-शुक्र या ग्रहांची युती बाधक असून नैसर्गिक आपत्ती दर्शवते.
मंगळ ग्रह अष्टम स्थानात आहे. मंगळ ग्रह द्वितीय आणि सप्तम या स्थानांचा स्वामी आहे. तो अष्टम स्थानात हर्षल ग्रहाच्या युतीत आहे. हा योग स्फोटक आणि तीव्र परिणाम करणारा आहे. ज्वालामुखी, अग्निकांड, मोठ्या दुर्घटना दर्शवतो. मंगळ आणि हर्षल या ग्रहांचा द्वितीय स्थानातील चंद्र ग्रहाशी प्रतियोग असल्याने स्फोटक परिणामाची तीव्रता अधिक वाढली आहे.
द्वादश (व्यय) स्थानाचा स्वामी बुध ग्रह वक्री आणि अस्तंगत स्थितीत आहे. त्यामुळे व्यय स्थान अधिक प्रतिकूल आहे. बुध ग्रह एकादश स्थानात आहे. तूळ लग्नकुंडलीसाठी एकादश स्थान बाधक असते. रवि एकादश स्थानाचा स्वामी असल्याने बाधकेश आहे. बुध ग्रह रवि ग्रहाच्या म्हणजे बाधकेश ग्रहाच्या युतीत असल्याने पुष्कळ हानी दर्शवतो.

२२.१२.२०१८ या दिवशीच्या गोचर कुंडलीत (तात्कालिक कुंडलीत) असलेले योग

२२.१२.२०१८ या दिवशीची गोचर कुंडली पुढे दिली आहे. त्यातील ग्रहांचे इंडोनेशियाच्या लग्न कुंडलीतील ग्रहांशी कसे योग आहेत, याचे विश्‍लेषण पुढे दिले आहे.


विश्‍लेषण

चतुर्थ स्थानाचा स्वामी शनि ग्रह तृतीय स्थानात आहे. शनि ग्रहाचा मूळ कुंडलीतील (लग्न कुंडलीतील) राहू आणि शुक्र (अष्टमेश) या ग्रहांशी प्रतियोग झाला आहे. त्यामुळे चतुर्थेश शनि ग्रह दूषित झाला आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीला पूरक असे वातावरण निर्माण झाले.
कुंडलीतील मारक स्थानांचा स्वामी मंगळ ग्रह पंचम स्थानात आहे. त्याचा मूळ कुंडलीतील मंगळ आणि हर्षल या ग्रहांशी केंद्रयोग (अशुभयोग) आहे. हा केंद्रयोग स्फोटक परिणाम दर्शवतो. मंगळ ग्रहाची अष्टम, एकादश (लाभ) आणि द्वादश (व्यय) या स्थानांवर दृष्टी आहे. मंगळ ग्रहाच्या दृष्टीमुळे अष्टम आणि द्वादश या हानीकारक स्थानांची अशुभता आणखी वाढली, तर एकादश या लाभदायी स्थानाची शुभता अल्प झाली. 
यांतील निर्णायक स्थिती रवि ग्रहाची आहे. रवि एकादश स्थानाचा स्वामी असल्याने बाधकेश आहे. बाधकेश रवि ग्रह गोचरीने तृतीय स्थानात आहे. त्याची चतुर्थेश शनि ग्रहाशी युती असून ही युती आपत्तीदर्शक आहे. या दिवशी पौर्णिमा होती; म्हणजे रवि आणि चंद्र हे ग्रह समोरासमोर (प्रतियोगात) होते. गोचरीचा रवि ग्रह मूळ कुंडलीतील राहू ग्रहाच्या प्रतियोगात आहे. त्याच वेळी गोचरीचा चंद्र ग्रह मूळ कुंडलीतील राहू ग्रहाच्या युतीत आहे. याला सूक्ष्म चंद्रग्रहण म्हणता येईल. हा महत्त्वाचा कुयोग आहे. अशा योगावर रवि आणि चंद्र हे ग्रह दूषित होतात आणि अनिष्ट घटना घडतात.

पौर्णिमेच्या दिवशी त्सुनामी !

२२.१२.२०१८ या दिवशी पौर्णिमा होती. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राकडून समुद्राचे पाणी स्वत:कडे खेचण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. तसेच या दिवशी चंद्राची भ्रमणगतीसुद्धा अधिक होती. एरव्ही चंद्र २४ तासांत सरासरी १२ अंश अंतर आक्रमतो; त्सुनामीच्या दिवशी चंद्राची भ्रमणगती १४ ते १५ अंश इतकी जलद होती ! या दिवशी मंगळ ग्रहाचे मृग नक्षत्र होते. मंगळ ग्रह मारक स्थानांचा स्वामी आहे. वार शनिवार होता. मागे सांगितल्याप्रमाणे शनि ग्रहाची मूळ कुंडलीतील तसेच गोचर कुंडलीतील स्थिती अशुभ आहे. दिनांक २२ होता. २२ अंकाची बेरीज ४ येते. ४ या अंकावर हर्षल ग्रहाचे स्वामित्व आहे. २२.१२.२०१८ या दिनांकाची बेरीज ९ येते (२+२+१+२+०+१+८ = १८ = १+८ = ९). ९ या अंकावर मंगळ ग्रहाचे स्वामित्व आहे. यावरून असे लक्षात येते की, कुंडलीतील प्रतिकूल ग्रहांचे नक्षत्र, वार, दिनांक इत्यादी असतांना त्सुनामी लाट आली.

एकच ग्रहस्थिती; पण परिणाम वेगळे ?

काही वाचकांना वाटू शकते की, पूर्ण जगासाठी गोचर (वर्तमान) ग्रहस्थिती एकच असतांना इंडोनेशियातच त्सुनामी का आली ? याचे कारण असे की, प्रत्येक देशाच्या मूळ कुंडलीतील ग्रहस्थिती निराळी असल्याने वर्तमान ग्रहस्थितीचा परिणाम प्रत्येक देशासाठी निराळा असतो. जसे प्रत्येक मनुष्यासाठी एकच वर्तमान ग्रहस्थिती वेगवेगळा परिणाम करते, तसेच हे आहे.

काळाचा संबंध शोधूया !

२६.१२.२००४ या दिवशी इंडोनशियामध्ये प्रचंड मोठी त्सुनामी आली होती. एकट्या इंडोनशियात लक्षावधी लोक मरण पावले होते. त्या दिवशीसुद्धा पौर्णिमा, मृग नक्षत्र, शनिवार होता. अर्थात दोन त्सुनामी विशिष्ट काळात येण्यात काळाचा काहीतरी संबंध निश्‍चित असावयास हवा. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाद्वारे हा संबंध शोधता येऊ शकतो !

इंडोनेशियात यापूर्वी आलेले मोठे आणि मध्यम नैसर्गिक आपत्ती यांचा थोडक्यात आढावा भाग २ या लेखात घेऊया. नैसर्गिक आपत्तींच्या संदर्भात भाकिते करण्यास विज्ञानाची असमर्थता आणि ज्योतिषशास्त्राची समथर्र्ता यांचीही पुढील भागात चर्चा करूया. नमस्कार !

(नम्र विनंती : ज्योतिषतज्ञांना या लेखात काही सुधारणा सुचवायच्या असल्यास, त्यांनी त्या आवश्य कळवाव्यात.)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

श्री. राज धनंजय कर्वे, ज्योतिष विशारद
संपर्क क्र. ९४२३१८५२५६
ई-मेल : raj9karve@gmail.com

No comments:

Post a Comment

ऑस्ट्रेलियातील अग्नितांडव ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये सप्टेंबर २०१९ पासून सतत वणवा पेटत आहे. यामध्ये आतापर्यंत ५० कोटी प्राण्यांचा बळी गे...