Wednesday, January 2, 2019

स्वामी स्वरूपानंद, पावस


स्वामी स्वरूपानंद, पावस


आज मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशीस (२.१.२०१९ या दिवशी) स्वामी स्वरूपानंद (पावस) यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांचा जीवनप्रवास आणि त्यासंबंधी ग्रहयोग यांचा या लेखात विचार केला आहे. स्वामी स्वरूपानंद यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

स्वामी स्वरूपानंद, पावस


लेखातील ठळक सूत्रे :
  • सात्त्विक वातावरण असलेल्या घराण्यात जन्म
  • स्वावलंबित्व, नेतृत्वगुण, स्वातंत्र्यप्रेम आदी गुणवैैशिष्ट्ये
  • स्वावलंबाश्रमाची स्थापना
  • सद्गुरूंची प्रथम भेट
  • उत्कट गुरुभक्ती
  • कारावासातही साधना
  • कालौघात देहास आजार
  • साक्षात् श्रीमहाविष्णुचे सगुण दर्शन !
  • महासमाधी
  • अंत:स्फूर्तीतून सिद्ध झाले अलौकिक ग्रंथ !




सात्त्विक वातावरण असलेल्या घराण्यात जन्म

पावस, रत्नागिरी येथे श्री. विष्णुपंत गोडबोले आणि सौ. रखमाबाई गोडबोले हे दांपत्य रहात. श्री. विष्णुपंत श्रीविष्णुंचे भक्त होते. ते सदैव विष्णूसहस्रनामाचा पाठ करत. अशा सात्त्विक वातावरण असलेल्या घराण्यात स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी या तिथीस (१५.१२.१९०३) झाला. कुंडलीतील द्वितीय स्थान घराण्याचे कारक स्थान आहे. त्याचा स्वामी चंद्र ग्रह पंचम या कोणस्थानात (शुभस्थानात) आहे. तसेच चंद्र ग्रह विशाखा या गुरु ग्रहाच्या नक्षत्रात असून गुरु ग्रह नवम (भाग्य) स्थानात आहे. चंद्र आणि गुरु यांचा नवपंचमयोग (शुभयोग) आहे. हे योग घराण्यात सात्त्विक वातावरण, सदाचरण अन् उपासना दर्शवतात. चंद्र ग्रह गुरु ग्रहाच्या नक्षत्रात असल्यामुळे जन्मत: गुरु ग्रहाची महादशा होती. त्यामुळे बालपणापासूनच त्यांना गीतेविषयी जिज्ञासा होती. बाल्यापासुनि गीताध्ययनीं होता मज बहु छंद असे त्यांनीच म्हटले आहे.

स्वावलंबाश्रमाची स्थापना

स्वामीजींनी लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांचा आदर्श घेऊन राष्ट्रोद्धारासाठी तरुणांना स्वावलंबनाचेशिक्षण देणेे, या ध्यासाने वयाच्या २० व्या वर्षी पावस येथे स्वावलंबाश्रमाची स्थापना केली. लग्न स्थानाचा स्वामी बुध ग्रह धनु राशीत आणि मूळ नक्षत्रात असल्याने स्वावलंबित्व, नेतृत्वगुण, स्वातंत्र्यप्रेम अशीगुणवैशिष्ट्ये दर्शवतो. पुढे काही विद्यार्थ्यांसोबत पुण्याला जाऊन स्वामीजींनी विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि स्वत:चे वाङ्मय विशारदचे शिक्षण आरंभ केले. नवम स्थानातील गुरु ग्रह वाङ्मय विशारदच्या शिक्षणास अनुकूल आहे.

सद्गुरूंची प्रथम भेट

इसवी सन् १९२३ मध्ये स्वामीजींचे मामा श्री. केशवराव गोखले यांच्यामुळे पुण्यास सद्गुरु श्री. गणेशनाथ उपाख्य बाबामहाराज वैद्य यांच्या भेटीचा योग आला. श्री. बाबामहाराज हे श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्या नाथ परंपरेतील एक थोर साक्षात्कारी सत्पुरुष होते. स्वामीजींना त्यांचा अनुग्रह लाभला आणि स्वामीजींच्या आध्यात्मिक जीवनास सुरुवात झाली. त्यावेळी शनि महादशेअंतर्गत बुध ग्रहाची अंतर्दशा चालू होती. शनि ग्रह भाग्य स्थानाचा आणि बुध ग्रह लग्न स्थानाचा स्वामी आहे. दोन्ही ग्रह अध्यात्मास पूरक आहेत.

उत्कट गुरुभक्ती

स्वामीजींचे सद्गुरु श्रीज्ञानेश्‍वरीची हस्तलिखित प्रत प्रतिदिन वाचत. ती प्रत जीर्ण झालेली पाहून स्वामीजींनी चार मासांच्या (महिन्यांच्या) कालावधीत स्वताच्या हस्ताक्षरात श्रीज्ञानेश्‍वरी लिहून ती सद्गुरूंना अर्पण केली. या प्रसंगातूनत्यांच्या गुरुभक्तीचा प्रत्यय येतो. गुरुभक्ती म्हणजे शिष्याच्या मनात गुरूंप्रती असणारा भाव ! कुंडलीत चंद्र ग्रह स्वराशीतील शुक्र ग्रहाच्या युतीत आहे. शुक्र ग्रह जलतत्त्वाचा कारक असल्याने प्रेम त्याच्या आधिपत्याखाली येते. शुक्र आणि चंद्र या ग्रहांवर गुरु ग्रहाची नवम स्थानातून दृष्टी असल्याने हे प्रेम प्रत्यक्ष गुरुमाऊलींप्रती होते ! शुक्र-चंद्र-गुरु या ग्रहांचे परस्परांतील योग उच्च कोटीची गुरुभक्ती दर्शवतात. तिन्ही ग्रह कोणस्थानांमध्ये असल्याने शुभ आणि बलवान आहेत.

कारावासातही साधना

मिठाच्या सत्याग्रहासाठी कोकणात दौरे काढल्याने आणि स्वत: सत्याग्रह केल्याने त्यांना अटक करून येरवडा कारागृहात बंदिस्त केले गेले. सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात असणार्‍या स्वामीजींसाठी ही जणू सुवर्णसंधी होती.तिचा लाभ घेऊन एकांतवासात स्वामीजींनी ध्यानाची साधना केली. कारागृहात असतांना त्यांनी  नवरत्नहार या काव्याची रचना केली. कारागृहातून मुक्तता झाल्यावर ते काव्य त्यांनी गुरुचरणी अर्पण केले. तेव्हा बाबामहारजांना अतिशय आनंद झाला. त्यांनी स्वामीजींच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून स्वामी स्वरूपानंद असे त्यांचे नामकरण केले. कारावासचा विचार व्यय स्थानावरून केला जातो. व्यय स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह राहू ग्रहाच्या नक्षत्रात आहे. राहू ग्रह व्यय स्थानाचा कार्येश झाल्यामुळे तसा प्रसंग आला; परंतु व्ययेश शुक्र ग्रह पंचम या उपासनेच्या कारक स्थानात असल्याने कारागृहात त्यांनी साधना केली आणि गुरूंना प्रसन्न करून घेतले.

कालौघात देहास आजार

स्वामीजी पावस येथे परतल्यावर त्यांना मलेरिया झाला. पुढे सन् १९३४ मध्ये स्वामीजी श्री. देसाई यांच्याकडे काही दिवस हवापालट म्हणून रहावयास गेले. त्यांना पुष्कळ अशक्तपणा असल्याने, तसेच स्वामीजींच्या वृद्ध मातोश्रींना स्वामींजींची सर्व व्यवस्था लावणे उतारवयामुळे कठिण असल्याने श्री. देसाई यांंच्याकडेच पुढील ४० वर्षे स्वामीजी वास्तव्यास राहिले. श्री. देसाई यांनी स्वामीजींची मनोभावे सेवा केली. षष्ठ स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह अष्टम स्थानात अष्टमेश शनि ग्रहासोबत आहे. हा योग आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहे. अशक्तपणा, थकवा, सतत काही ना काही आजारपण दर्शवतो.

साक्षात् श्रीमहाविष्णुचे सगुण दर्शन !

निर्गुण साक्षात्कारानंतर स्वामीजींना भगवान श्रीविष्णुच्या सगुण रूपाचे दर्शन घेण्याची तीव्र तळमळ लागली. सन् १९४२ या वर्षी रहात्या खोलीत स्वामीजींना श्रीमहाविष्णुचे प्रत्यक्ष दर्शन झाले. त्यावेळी लग्नेश बुध ग्रहाची महादशा होती आणि पंचमेश शुक्र ग्रहाची अंतर्दशा होती.

महासमाधी

१५.८.१९७४ या दिवशी स्वामीजींनी महासमाधी घेतली. त्या वेळी व्ययेश शुक्र ग्रहाची महादशा होती. याच दिवशी गुरु ग्रहाची अंतर्दशा संपली होती. गोचरीचा अष्टमेश शनि ग्रह लग्न स्थानी होता. आत्माकारक रवि ग्रह आणि लग्न स्थानाचा स्वामी बुध यांची युती होती. गोचरीचा रवि ग्रह मूळ कुंडलीतील अष्टमेश शनि ग्रहाच्या प्रतियोगत होता.

अंत:स्फूर्तीतून सिद्ध झाले अलौकिक ग्रंथ !

स्वामीजींनी अभंग ज्ञानेश्‍वरी, श्री भावार्थगीता, श्री अभंग अमृतानुभव, संजीवनी गाथा इत्यादी प्रासादिक ग्रंथांची रचना केली. पंचम स्थानातील चंद्र-शुक्र या ग्रहांची युती कवित्वशक्ती, प्रतिभा दर्शवते. चंद्र-शुक्र या ग्रहांचा गुरु अन् नेपच्यून या ग्रहांशी धर्मत्रिकोणात नवपंचमयोग असल्याने अंत:स्फूर्ती होऊन त्यांनी अलौकिक असे पद्यरूपातील आध्यात्मिक ग्रंथांची निर्मिती केली. तृतीय स्थानाचा स्वामी रवि भावचलित कुंडलीनुसार सप्तम स्थानात असल्याने लेखनामुळे कीर्ति लाभली. दशम स्थानाचा स्वामी गुरु ग्रह भाग्य स्थानी असणे, दशम स्थानात मीन राशीतील केतू ग्रह असणे, दशम स्थानावर शनि ग्रहाची दृष्टी असणे यांमुळे आध्यात्मिक ग्रंथरचना, शिष्यांना साधनेविषयी मार्गदर्शन इत्यादी आध्यात्मिक कार्य हेच स्वामींजींचे कर्म झाले.
व्यय स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह पंचम स्थानात असून त्यावर शनि अन् गुरु या ग्रहांची दृष्टी असल्यानेेे, तसेच कुंडलीतील इतर आध्यात्मिक योगांमुळे शाश्‍वत असणारी मोक्षप्राप्ती झाली (नित्य आनंदावस्था लाभली).

(जीवनप्रवासाच्या माहितीचा संदर्भ : swamiswaroopanandpawas.in)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

श्री. राज धनंजय कर्वे, ज्योतिष विशारद
संपर्क क्र. ९४२३१८५२५६
ई-मेल : raj9karve@gmail.com

No comments:

Post a Comment

ऑस्ट्रेलियातील अग्नितांडव ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये सप्टेंबर २०१९ पासून सतत वणवा पेटत आहे. यामध्ये आतापर्यंत ५० कोटी प्राण्यांचा बळी गे...