Tuesday, December 25, 2018

शेतकर्‍यांची कर्जमाफी...



शेतकर्‍यांची कर्जमाफी...

(मेदिनीय ज्योतिषशास्त्राच्या आधारे केलेले विश्‍लेषण)




विषयप्रवेश : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तिसगड, तेलंगण आणि मिझोराम या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल ११.१२.२०१८ या दिवशी घोषित झाले. त्यानंतर लगेचच काही दिवसांमध्ये मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगड या राज्यांमध्ये शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्याचे घोषित झाले. तसेच गुजरात आणि आसाम या राज्यांमध्येही शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली गेली. यामुळे शेतकर्‍यांना तात्पुरता दिलासा मिळाला; मात्र राज्यांच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडला. कर्जमाफी ही कृषीविषयक समस्येवरील उपाय असू शकत नाही, असे नीती आयोगाने स्पष्ट केले. ५ राज्यांमधील कर्जमाफीच्या घोषणा ५ दिवसांत झाल्या. कर्जमाफी हा विषय राज्यांच्या पर्यायाने राष्ट्राच्या संदर्भात असल्याने भारताच्या लग्न कुंडली (स्वातंत्र्यदिनाची कुंडली)आणि गोचर कुंडली (तात्कालिक कुंडली) यांवरून या ५ दिवसांतील ग्रहस्थितीचा आढावा घेऊया. मेदिनीय ज्योतिष पद्धतीत राष्ट्राच्या संदर्भात राष्ट्राच्या कुंडलीवरून अभ्यास केला जातो.

विश्‍लेषण

मेदिनीय ज्योतिषात कुंडलीतील चतुर्थ स्थानावरून शेती, तसेच शेतकर्‍यांचा विचार केला जातो. भारताच्या गोचर कुंडलीत चतुर्थ स्थानाचा स्वामी रवि ग्रह अष्टम स्थानात आहे. अष्टम स्थान हे एकप्रकारचे धनस्थान आहे. अष्टम स्थान अचानक धनलाभाचे कारक स्थान आहे. चतुर्थेश रवि ग्रह अष्टम स्थानात असणे, हा योग शेतकरी वर्गाच्या कर्जमाफीसाठी निर्णायक घटक ठरला. रवि ग्रह १६ डिसेंबर २०१८ पर्यंत गोचर कुंडलीतील सप्तम स्थानात होता; त्यानंतर तो अष्टम स्थानात गेला अन् कर्जमाफीच्या घोषणा सुरू झाल्या. परंतु केवळ रवि ग्रह या परिणामाला कारणीभूत नाही; कारण प्रत्येक वर्षी रवि ग्रह अष्टम स्थानात एक महिना असतो. त्यामुळे प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावयास हवी; पण तसे होत नाही; कारण इतर ग्रहयोग संबंधित घटनेला अनुकूल किंवा प्रतिकूल असतात. येथे अष्टम स्थानात झालेली रवि आणि शनि या ग्रहांची युती महत्त्वाची आहे. शनि ग्रह दशम स्थानाचा स्वामी आहे. दशम स्थान हे सरकार, सत्ताधारी पक्ष यांचे कारक स्थान आहे. त्यामुळे अष्टम स्थानात असणारी रवि आणि शनि या ग्रहांची युती सरकारद्वारे शेतकर्‍यांना कर्जमाफी हा परिणाम दर्शवते. येथे काही जणांना असे वाटेल की, रवि आणि शनि हे ग्रह पुढे जेव्हा अष्टम स्थानात पुन्हा एकत्र येतील, तेव्हा पुन्हा कर्जमाफी होईल, असेे भाकित आपण वर्तवू शकतो का ?, तर येथे पुन्हा नाही असे उत्तर आहे. कारण जरी एखादा ग्रहयोग एखादा परिणाम करण्यास मुख्य भूमिका बजावत असला, तरी त्याला साहाय्यकारक असे इतर ग्रहयोग असतात. इतर ग्रहांचा सहयोग वरील गोचर कुंडलीत कसा झाला, ते पाहूया. ५ राज्यांमधील शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली; म्हणजेच दुसर्‍या शब्दात राष्ट्राने ते कर्ज स्वत:वर घेतले. कुंडलीतील षष्ठ स्थान हे कर्ज घेण्याचे कारक स्थान आहे. गोचर कुंडलीत शुक्र ग्रह षष्ठ स्थानात तूळ राशीत म्हणजे स्वराशीत आहे. षष्ठ स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह बलवान झाल्याने आणि शुक्र्र ग्रह धनाचा कारक ग्रह असल्याने देशाला कर्ज घ्यावे लागले. येथे असा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो की, शुक्र ग्रह नैसर्गिक शुभग्रह असूनही कर्ज घेण्यासारखा प्रसंग कसा आला ? भारताच्या लग्न कुंडलीत षष्ठ स्थानात गुरु ग्रह असून तो अष्टम स्थानाचा स्वामी आहे. या मूळ गुरु ग्रहावरून शुक्र ग्रह गोचर झाल्याने हा परिणाम झाला. मूळ गुरूला अष्टम स्थानाचा स्वामी असल्याचा दोष आहे.

आगामी ग्रहस्थिती आणि तिचा परिणाम

सध्या गोचरीचा शनि ग्रह अष्टम स्थानात आहे. तो एप्रिल २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात वक्री होत आहे आणि पुढील साधारण ५ महिने वक्री रहाणार आहे. एप्रिल महिन्यातच अष्टम स्थानातील गुरु ग्रह वक्री होणार आहे. राहू ग्रह त्यावेळी द्वितीय स्थानात असेल; त्यामुळे शनि आणि राहू या ग्रहांचा प्रतियोग (अशुभयोग) होणार आहे. हे योग द्वितीय आणि अष्टम या स्थानांमध्ये होणार आहेत. द्वितीय स्थान हे देशातील बँका, शेअर मार्केट, सरकारी ताळेबंद इत्यादी आर्थिक गोष्टींशी संबंधित आहे. अष्टम स्थान हे दुर्घटना, मृत्यू, नुकसान इत्यादींचे कारक आहे. एप्रिल २०१९ नंतरचे योग देशाच्या आर्थिक स्थितीसाठी पुष्कळ अशुभ आहेत. द्वितीय स्थानातील राहू ग्रहामुळे सरकारी कारभारात अनियमितता दिसून येण्याची शक्यता आहे. अष्टम स्थानातील दूषित शनि ग्रहामुळे पेट्रोलच्या किमती अणि महागाई वाढू शकते. देशभरात मंदीचे वातावरण राहू शकते. रवि ग्रह मीन राशीत गोचर झाल्यावर (मार्च किंवा एप्रिल २०१९ मध्ये ) पुन्हा कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. मे २०१९ मध्ये मंगळ आणि राहू यांची द्वितीय स्थानात युती होणार असल्याने घोटाळे, बँकांमधील अपहार उघड होण्याची शक्यता आहे. अग्निकांड, हिंसक आंदोलने, अनैतिकता, आतंकवादी कारवाया यांमुळे सर्वप्रकारचे नुकसान संभवते. जातीनिहाय आरक्षणामुळे देशात अस्थिरता निर्माण होऊ शकते. षष्ठेश शुक्र ग्रह जुलै २०१९ मध्ये राहू ग्रहाशी वायुराशीत युती करणार असल्याने साथीचे रोग, विचित्र रोग यांची लागण होण्याची शक्यता आहे.

(नम्र विनंती : वरील लेखात वाचकांना किंवा ज्योतिष तज्ञांना काही सुधारणा वाटत असल्यास त्यांनी आम्हाला आवश्य कळवाव्यात.) (२५.१२.२०१८)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

श्री. राज धनंजय कर्वे, ज्योतिष विशारद
संपर्क क्र. ९४२३१८५२५६
ई-मेल : raj9karve@gmail.com
karvejyotishsanshodhan.blogspot.com

2 comments:

  1. फारच छान...

    ReplyDelete
  2. अशा प्रकारचे संशोधन राष्ट्र आणि धर्माच्या दृष्टीने महत्वाचे आहे.अभिनंदन!

    ReplyDelete

ऑस्ट्रेलियातील अग्नितांडव ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये सप्टेंबर २०१९ पासून सतत वणवा पेटत आहे. यामध्ये आतापर्यंत ५० कोटी प्राण्यांचा बळी गे...